दहा दिवसात निळजेपुलावर वाहतूक सुरु होणार

निळजे पुलावरील वाहतूक येत्या दहा दिवसात सुरू करण्यात येणार आहे. हलक्या वाहनांना या पुलावरुन जाण्यास परवानगी असेल. अवजड वाहनांची वाहतूक मात्र तळोजामार्गे वळवण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज पुलाच्या कामाची पाहणी केली. 15 जूनपासून निळजे पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. शीळ फाटामार्गे ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे या परिसरात जाणाऱ्या वाहनांना निळजे पुलावरील वाहतूक बंद झाल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे काम जलदगतीने व्हावे यासाठी शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. गेल्या आठवड्यात राज्य रस्ते विकास महामंडळाने पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले होते. आज हे काम पूर्ण होत असून उद्यापासून रेल्वेच्या हद्दीतील कामाची सुरुवात करण्यात येईल. पुलाच्या चार गर्डर पैकी दोन गर्डरच्या बळकटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाची चाचणी घेऊन हलक्या वाहनांसाठी पुलावरील वाहतूक खुली करण्यात येईल. दरम्यान पुलाच्या इतर दुरुस्तीच्या कामांची पाहणीही यावेळी करण्यात आली. या पुलावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक तळोजामार्गे वळवण्यात येणार आहे. यामुळे हलक्या वाहनांना वाहतुक कोंडीचा फटका बसणार नाही अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading