तिसरा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा

ठाणे महापालिका आणि विद्या प्रसारक मंडळाचे बी.एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय यांच्याद्वारे संयुक्तपणे तिसरा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विज्ञान आणि पर्यावरण शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना हवा सर्वेक्षणाबाबतचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही महापालिकेच्या पर्यावरण विभागाद्वारे देण्यात आले. जागतिक स्तरावर हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ मध्ये ७४व्या महासभेमध्ये “7 सप्टेंबर” हा “आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत ठराव संमत केला आहे. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा वायू प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष केंद्रीत करुन सामूहिक उत्तरदायित्व आणि सामूहिक कृतीच्या आवश्यकतेबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे हा आहे. त्यानुसार प्रतिवर्षी विविध संकल्पनांद्वारे जगभर हा दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसासाठी ‘हवा आपली सगळ्यांची’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली. ठाणे महापालिका नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देते. त्यानुसार, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता शहरामध्ये नियमितपणे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिका आणि बी.एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय यांनी संयुक्तपणे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य मोझेस कोलेत यांनी वातावरणातील प्रदूषणाची उत्पत्ती आणि काळानुसार वाढत जाणारे प्रदूषण नियंत्रणाकरिता सर्व देशांद्वारे विविध पद्धतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत अत्यंत सोप्या शब्दांत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे वैज्ञानिक अधिकारी राजू जाधव यांनी हवा सर्वेक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध पद्धती व संसाधनांचे सादरीकरण केले. त्यानंतर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हवा आपली सगळ्यांची’ या संकल्पनेवर सादरीकरण केले. ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केंद्र शासनाकडून उपलब्ध अनुदानातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याबाबत सादरीकरण केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ठाणे महापालिकेच्या फिरत्या प्रयोगशाळेत सर्वेक्षणाबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण महापालिकेच्या क्षेत्र अधिकारी संचिता कडलक यांनी दिले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading