ताप आला की पाल्याला ताबडतोब आरोग्य केंद्रात घेऊन या, उशीर जीवावर बेतू शकतो – महापालिका आयुक्तांचे आवाहन

पाल्याला ताप आला तर तो कसला याची वाट न पाहता त्याला लगेच नागरी आरोग्य केंद्रात घेऊन यावे. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. उशीर झाला तर ते पाल्याच्या जीवावर बेतू शकते असं कळकळीचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. गोवरबद्दल कोणतीही माहिती हवी असेल तर ७३०६३ ३०३३० या हेल्पलाईन वर संपर्क साधावा. ही हेल्पलाईन २४ तास सुरू असून रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका घरी पाठवली जाईल असे आयुक्तांनी सांगितले. गोवरचे रुग्ण लवकरात लवकर शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. गोवर सदृश लक्षणे असलेला रुग्ण आला तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राकडे लगेच द्यावा. खाजगी डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी गोवरची लक्षणे असलेला रुग्ण आला तर काय करायचे याची एक कार्यपद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आशा सेविकांनी सर्व बालकांचा पाठपुरावा करून गोवर असेल तर नागरी आरोग्य केंद्रात त्याची माहिती द्यावी. त्यासाठी आशा सेविकांना अतिरिक्त मोबदला देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. तसंच स्थलांतरित नागरिकांमधील पाच वर्षाखालील बालकांची नोंद करून घ्यावी. त्यांचा आशा सेविकांमार्फत आढावा घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. पार्किंग प्लाझा मध्येही विशेष वॉर्ड तयार आहे. रुग्णालयात अतिरिक्त बालरोगतज्ज्ञ, अतिरिक्त शिकाऊ डॉक्टर आणि अतिरिक्त नर्सेस यांची उपलब्धता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. गोवर विरोधी लढ्यात लसीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे. चारही आरोग्य केंद्रे आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे सातही दिवस लसीकरण सुरू आहे. दुर्देवाने, काही पालक अजूनही लसीकरण करण्यास तयार नाहीत. त्यांनी हे लक्षात घ्यावे, आपण लसीकरणाला नकार देणे म्हणजे आपल्या बालकाचा जीव धोक्यात घालणे. लसीकरणात काही अडचणी आल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांची मदत अवश्य घ्यावी. सर्व नागरिकांनी सर्वेक्षण गटाला सहकार्य करावे. तसेच लसीकरण केले नसेल तर तत्काळ करून घ्यावे असंही महापालिका आयुक्तांनी सांगितलं.

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading