तमिळ अभिनेत्रीचे लसीकरण परदेशी जाणारे विद्यार्थी वाऱ्यावर – भारतीय जनता पक्षाची टीका

महापालिकेच्या लसीकरण मोहिमेतील गोंधळाचे नवनवे प्रकार उघडकीस येत असून यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कुपनची पळवापळवी सुरू होती. आता चक्क तमिळ, तेलगू अभिनेत्रीचे लसीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गैरप्रकारात आरोग्य कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट घेतलेली कंपनी सहभागी असून, शिवसेना आणखी किती काळ संबंधित कंपनीला पाठिशी घालणार आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या मनोहर डुंबरे यांनी केली आहे. तमिळ अभिनेत्रीचे लसीकरण करीत असताना, परदेशात जाणारे विद्यार्थी मात्र लसीकरणापासून वंचित आहेत. त्यांना लस देण्याबाबतचा निर्णय घेण्यास महापालिकेला वेळ नाही, याकडेही डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड हॉस्पिटलमध्ये तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या मिरा चोप्रा या अभिनेत्रीने लस घेतली. या हॉस्पिटलमध्ये लस घेत असल्याची छायाचित्रे तिने सोशल मीडियावर उघड केली. त्याचबरोबर महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य कर्मचारी पुरविण्याचे काम घेतलेल्या ओम साई आरोग्यकेअर प्रा. लि. कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत असल्याचे ओळखपत्र जाहीर केले आहे. पात्र नसतानाही अभिनेत्रीला लस देण्याच्या प्रकारातून लसीकरण मोहिमेतील गोंधळ उघड झाला आहे. या अभिनेत्रीने सोशल मिडीयात पोस्ट केल्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यामुळे यापूर्वीही अनेक व्हीआयपींना लस दिली गेली असावी, अशी शक्यता मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित अभिनेत्रीला लस दिल्याप्रकरणी जबाबदार ओम साई आरोग्यकेअर कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच फ्रंटलाईन आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी म्हणून लस दिलेल्या व्यक्तींच्या कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणीही मनोहर डुंबरे यांनी केली आहे. हॉस्पिटलमधील गोंधळाला अनेक वेळा कारणीभूत ठरलेल्या ओम साई आरोग्यकेअर कंपनीला सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासनाकडून पाठिशी का घातले जात आहे, याचा खुलासा करावा. एकिकडे महापौर नरेश म्हस्के यांनी लसीकरण मोहीमेतील व्हीआयपी कल्चर बंद करण्याचे जाहीर केले होते. मात्र, महापालिकेच्याच हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी अपात्र असलेल्या अभिनेत्रीचे लसीकरण झाले. बहुदा हे व्हीआयपी कल्चर नसावे, हे कोणते कल्चर ते महापौर नरेश म्हस्के यांनी जाहीर करावे, असा टोला मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading