डोंबिवलीत घुमले हम होंगे कामयाबचे सूर

घरादाराची पर्वा न करता एक कर्तव्य म्हणून गेले सव्वा वर्षे कोविड रुग्णांची सेवा करणाऱे डॉक्टर्स, नर्सेस आणि कोविड सेंटरमधील इतर कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीला आणि जिद्दीला शिवसेनेने मानाचा मुजरा केला. कल्याण लोकसभा क्षेत्रातील अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व कोविड सेंटर्समधील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करुन खासदार श्रीकांत शिंदे यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. अक्षयतृतीया आणि रमजान ईदच्या या पवित्र दिनी श्रीकांत शिंदे यांनी अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मार्च 2020 मध्ये कोविडने महाराष्ट्रात शिरकाव केला, त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही कोविडचा व्हायरस धुमाकुळ घालत आहे. मात्र या जीवघेण्या व्हायरसमधून रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर कर्मचारी जीवाची पराकाष्ठा करीत आहेत. सर्वजण या अदृश्य लढाईत एखाद्या सैनिकासारखे लढत आहेत. दिवसभर पीपीई किट, भयाण शांतता, एक अनामिक भीती या विदारक परिस्थिीतीतही हे सर्व डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग आपले वैद्यकीय कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळेच या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर महापालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या क्षेत्रातील सर्व कोविड सेंटर्समधील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करुन कृतज्ञता व्यक्त केली. डोंबिवली येथील सावळाराम क्रिडा संकुलातील एका कोविड सेंटरजवळ हा अविस्मरणीय कार्यक्रम पार पडला. आपण एकटे नाही या लढाईत आम्ही देखील आपल्या सोबत आहोत असा शब्द खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला. विशेष म्हणजे या मिठाईच्या बॉक्सबरोबर सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि सफाई कर्मचारी यांना आभारपत्रही देण्यात आले. ‘हम होंगे कामयाब एक दिन, ओ हो मन मे है विश्वास, पुरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन’ या पत्रातल्या ओळी वाचून डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गामध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आमच्या पाठीवर थाप मारुन ‘फक्त लढ म्हणा’ असे सांगणारे कोणीतरी हवे होते ते काम खासदारांनी केले असल्याचे डॉक्टरांनी आवर्जुन सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading