डॉ. मूस रस्त्यावरील सुलभ शौचालयाला लावलेलं टाळं माजी महापौरांनी तोडलं

ठाण्यातील डॉ. मूस रस्त्यावर असलेल्या सुलभ शौचालयाला पालिका प्रशासनानं लावलेलं टाळं श्रमजीवी संघटनेच्या नेहा दुबे आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी तोडलं. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिला आपला चरितार्थ चालवण्यासाठी गेली अनेक वर्ष ठाण्यात येतात. ठाण्यातील बाजारपेठ रस्त्यावर फुलं, फळं विकण्यासाठी त्या त्या हंगामात येत असतात. यासाठी या महिला आपल्या घरून पहाटेच्या सुमारास येतात. काही महिला तर त्या त्या हंगामापुरत्या त्याच परिसरात राहत असतात. त्यामुळं त्या महिलांचं दैनंदिन जीवन रस्त्यावरच सुरू असतं. पण या महिलांमुळेच सर्वसामान्य इतर महिलांना त्यांचे सण-उत्सव साजरे करता येतात. या महिला महापालिकेच्या सुलभ शौचालयाचा वापर करतात. पण अचानक महापालिका प्रशासनानं सुलभ शौचालयाला टाळं ठोकलं. त्यामुळं फुलं विकण्यासाठी आलेल्या अनेक महिलांची गैरसोय झाली. याचं वृत्त येताच त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. श्रमजीवी संघटनेनं या प्रकाराला विरोध केला. शौचालय बंद करायचं होतं तर पर्यायी व्यवस्था त्यासाठी करणं गरजेचं होतं. पण तसं काही न करता अचानक टाळं ठोकण्यात आल्यामुळं त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही या शौचालयाचं टाळं तोडून हे शौचालय महिलांसाठी खुलं केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading