डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. चित्रकला कक्षात सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत या कार्यक्रमासाठी आठवीचे शंभर विद्यार्थी उपस्थित होते. समिती प्रमुख साधना जोशी यांनी यावेळी वाचनाचे महत्त्व सांगून डॉक्टर कलाम यांच्या जीवनाचा विद्यार्थ्यांना थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर आर्या बाबर हिने गंगाधर गाडगीळ लिखित सात मजले हास्याचे, अंतरा पाटील हिने विश्वास पाटील लिखित महासम्राट , स्वरूप लांजेकर याने विजय निपाणेकर लिखित भीम बेटकाच्या शोधात व अथर्व कदम याने दिलीप प्रभावळकर लिखित बोक्या सातबंडे या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन केले. चार वेगवेगळ्या विषयांवर आधारित या पुस्तकातून विद्यार्थ्यांनी सहज जाता जाता मुशाफिरी केली. त्यानंतर विषय शिक्षिका साधना जोशी यांनी पुन्हा वाचनाचे महत्त्व पटवून देत माई सावरकर या स्वलिखित पुस्तकातील एक भावनिक प्रसंग विद्यार्थ्यांना वाचून दाखवला.
सर्वात शेवटी कार्यक्रमाचा समारोप करताना पुन्हा एकदा वाचनाचे महत्त्व पटवून घेत सर्व विद्यार्थ्यांनी रोज किमान एक पान वाचण्याचा संकल्प केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading