डेब्रिज टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर डेब्रिज टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याने शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा येत आहे. त्यामुळे डेब्रिज टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शहर सौंदर्यीकरण प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिका काम करत आहे. या कामाचा ठाणे महापालिका आयुक्तांमार्फत दर आठवड्याला आढावा घेतला जातो. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. तीन हात नाका जंक्शन, नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी जंक्शन, माजिवडा जंक्शन तसेच अन्य काही ठिकाणी जाहिरात हक्क तत्वावर सुशोभिकरण करण्यात आले आहे. तेथील उद्यानाचे सुशोभिकरण एक महिन्यात नव्याने केले जावे असे निर्देश आयुक्तांनी जाहिरात विभागाला दिले. त्याच बरोबर या चौकांमधील वाहतूक बेटांवर सध्या असलेली शिल्पे बदलून वैविध्यपूर्ण, आकर्षक शिल्पे बसविण्याच्या सूचना ही आयुक्तांनी दिल्या. शहर सौंदर्यीकरणाचे काम गतिमान होण्यासाठी प्रभागनिहाय कार्यकारी अभियंत्यांनी डेब्रिज उचलण्यासाठी तत्काळ डंपर आणि मनुष्यबळ उपलब्ध करावे, असेही निर्देश बांगर यांनी दिले. तसेच, कॅडबरी कंपनी जंक्शन येथे उड्डाणपुलाच्या खाली डेब्रिज टाकणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश आयुक्तांनी दिले.
आनंदनगर नाका ते माजिवडा जंक्शन पर्यंतच्या रस्ता दुभाजकाला विविध रंगसंगती मध्ये रंगवले जावे. तसेच, पूर्व द्रुतगती मार्ग येथे सुरू असलेले चित्रे काढण्याचे, रंगरंगोटीचे काम २१ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केले जावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रंगरंगोटीच्या कामाच्या ठिकाणी ठाणे महापालिका, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आदींचा उल्लेख स्पष्ट दिसेल असा करावा. त्यातून ठाणेकरांना महापालिकेतर्फे आपल्या शहरात सुरू असलेल्या कामाची योग्य माहिती मिळू शकेल. तसेच, सौंदर्यीकरण्याच्या माध्यमातुन महापालिकेची नवी ओळख नागरिकांना होऊ शकेल, असेही आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading