जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार

प्रदुषणासारख्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत असून नद्यांमधील गाळामुळे त्यांची वहन क्षमता कमी होत आहे. याबाबींचा विचार करून नदीला जाणून घेण्यासाठी तसेच समस्यांचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. चला जाणूया नदीला या अभियानात जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी या नद्यांसह त्यांच्या खोऱ्यातील कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोर नदी, लेणाड नदी, कुशीवली या नद्यांचाहीं या अभियानात समावेश असणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. चला जाणूया नदीला या अभियानाच्या माध्यमातून अमृत नदी यात्रा आयोजित करण्यात आली असून यामध्ये लोकसहभागही मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान 2 ऑक्टोबर ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये राज्यातील 75 नद्यांच्या ठिकाणी भेट देणार आहेत. या अभियानाचा पहिला टप्पा हा 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये अभ्यासावर भर देण्यात येणार आहे. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत यात्रेचा दुसरा टप्पा असणार आहे. या कालावधीत नद्यांचा उगम ते संगमापर्यंत नद्यांची अवस्था काय आहे. काय काम करावे लागेल, यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाला देण्यात येणार आहे. जलनायक डॉ. स्नेहल दोंदे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. जिल्ह्यातील विविध नद्या आणि त्यांच्या खोऱ्यातील नद्या, नाले, ओढे यांच्याही पुनरुज्जीवनासाठी या अभियानात अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या सर्व शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading