ठाण्यामध्ये मिळाली चार फूटाची मोठी घोरपड

ठाण्यामध्ये एक चार फूटाची मोठी घोरपड मिळाली आहे. ठाण्यामध्ये गेले तीन दिवस जोरदार पाऊस होता. जोरदार पावसामुळे डोंगरावरचे प्राणी हे खाली येतात. अशीच ही घोरपड खाली आली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. घोडबंदर रस्त्यावरील सूरज वॉटर पार्क समोर असणा-या स्टेट बँकेच्या जवळ ही मोठी घोरपड आढळली. त्यामुळं अमन सिंग आणि पराग शिंदे या प्राणी मित्रांना पाचारण करण्यात आले. सुरूवातीला या प्राणी मित्रांना एखादा सरडा असावा अशी शंका आली होती. पण एका पाईपमध्ये ही घोरपड अडकली होती. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं होतं. प्राणी मित्र अमन सिंग आणि पराग शिंदे यांनी अग्निशमन कर्मचा-यांच्या सहकार्यानं पाईपमधून या ४ फूट लांबीच्या घोरपडीस सुरक्षितपणे बाहेर काढलं. घोरपड ही संरक्षित वन्यप्राणी आहे. ही घोरपड नर असून या घोरपडीची सुटका केल्यानंतर आता हिला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे. घोरपडीबाबत अनेक गैरसमज असून काही लोकं औषधी असल्याच्या समजुतीनं घोरपड मारून खातात तर काही लोकांच्या मते घोरपड विषारी असते. मात्र घोरपड ही विषारी नसून ती शेपटीचा फटका सापाप्रमाणेच जीव वाचवण्यासाठीच देत असते असं पराग शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading