ठाण्यामध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत – उपनगरीय सेवा बंद

ठाण्यामध्ये कालच्याप्रमाणे आजही जोरदार पाऊस झाला. साडेसहाच्या सुमारास तासाभरात ७० मिलीमीटर पावसाची नोंद झआली. या जोरदार पावसामुळे ठाणे जलमय होऊन गेलं होतं. संध्याकाळच्या सुमारास पावसाचं वातावरण दिसत होतं. साडेपाचपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर ढगांचा कडकडाट आणि वीजांचा चमचमाट सुरू झाला आणि पावसाला सुरूवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की कधीही पाणी न साठणा-या गोखले रोडवरही पावलाच्या वर पाणी होतं आणि या पाण्याचा वेग जोरदार होता की पाण्यातून चालणं मुश्कील होतं, हिच परिस्थिती वामन हरी पेठेकडून स्टेशनला जाणा-या रस्त्यावरही होती. सर्व रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. नेहमीप्रमाणे रिक्षावाल्यांनी आढेगिरी सुरू केली आणि जवळच्या प्रवाशांची भाडी नाकारल्यामुळे रस्त्यावरून प्रवासी चालत जात होते. ठाण्यातल्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. पाऊस काही वेळानंतर थोडा थोडा थांबून येत होता. साडेसहाच्या एका तासात ७० मिलीमीटर पाऊस झाल्याने शहराची रयाच बिघडून गेली होती. जिकडे जावं तिकडे पाणीच दिसत होतं. आणि या पाण्यातूनच नागरिक घर गाठायला बघत होते. वाहन चालकांच्या बेशिस्तगिरीमुळे वाहतूक कोंडीचा अनुभवही येत होता. रात्री उशिरापर्यंत सर्वत्र हाच प्रकार होता. रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. या जोरदार पावसामुळे उपनगरीय गाड्या रस्त्यातच थांबल्या होत्या. रेल्वे मार्गातील उभ्या असलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना काय करावं कळत नव्हतं. अनेक गाड्या मध्येच अडकून पडल्या होत्या यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. ७ नंतर पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने प्रवाशांना घरी जायला मार्ग मिळत होता. रात्रीही नंतर पुन्हा पाऊस पडायला सुरूवात झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading