ठाण्यामध्ये जोरदार पाऊस – शहरात १०३ तर जिल्ह्यात ९७ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात १०३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं काल काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत होतं. मात्र संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत पावसाचा चांगलाच जोर होता. पाऊस सकाळच्या वेळेस तर कोसळत होता. यामुळं नेहमीप्रमाणे सखल भागात पाणी साचलं होतं. जोरदार पाऊस आणि वा-यामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. ९ ठिकाणी झाडं पडण्याच्या तर ११ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. जुनी म्हाडा कॉलनी, वंदना चित्रपटगृह, हरिओम नगर, वीर सावरकर मार्ग अशा विविध ठिकाणी पाणी साचलं होतं.

ठाणे शहराबरोबरच जिल्ह्यामध्येही गेल्या २४ तासात जोरदार म्हणजे सरासरी ९७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. उल्हासनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे १२८ तर मुरबाडमध्ये सर्वात कमी म्हणजे ७८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ठाणे तालुक्यात ६४, कल्याणमध्ये ९६, अंबरनाथमध्ये ११३, भिवंडी ११० तर शहापूरमध्ये ९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जूनपासून आजघडीपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी यंदा पावसानं ओलांडली आहे. गेल्यावर्षी १ जून ते ६ जुलैपर्यंत सरासरी ९०५ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर यंदा याच कालावधीत तो ९२० मिलीमीटर झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading