ठाण्यात शिवसेनेला धक्का, वर्तकनगरमधील शिवसैनिक भाजपात

ठाणे शहरात शिवसेनेला धक्का बसला असून, वर्तकनगर परिसरातील १०० हून अधिक शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ला असलेल्या भागातील शिवसैनिकांनी पक्षांतर केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख नितीन कदम, युवा सेनेचे उपयुवा अधिकारी वैभव सदाशिव कदम, उत्तर भारतीय सेलचे विभागप्रमुख अरविंद उपाध्याय, उपशाखाप्रमुख चेतन पालांडे, सुशांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली १०० शिवसैनिकांनी वर्तकनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात जाहीरपणे भाजपाचा झेंडा हाती घेतला. भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या सचिवपदावर नितीन कदम आणि वैभव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह २३ शिवसैनिकांना भाजपाने सन्मानाने संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या विकासाविषयीची तळमळ आणि भाजपाच्या धोरणांमुळे पक्षात प्रवेश केला असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading