ठाण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीसोबत तर कार्यकर्ते आघाडीसोबत असल्याचं चित्र

ठाण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीसोबत तर त्यांचे कार्यकर्ते आघाडी सोबत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षही सहभागी आहे. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीसोबत तर कार्यकर्ते आघाडी सोबत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. शिवसेनेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. राजन विचारे यांच्या कार्य अहवाल आणि वचननामा प्रकाशनाच्या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांना पाठीमागच्या खुर्चीवर बसवण्यात आले तसंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं छायाचित्र विचारे यांच्या अहवालात दुय्यम नेत्यासोबत छापण्यात आल्यामुळं कार्यकर्त्यांनी अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमातच विरोध दर्शवला होता. त्यावेळेसही शिवसेनेचे नेते समजूत घालायला आले नसल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. विचारे यांच्या प्रचारासाठी होणा-या चौकसभा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना बोलावलं जात नाही. सातत्यानं होणारा अपमान सहन होत नसल्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading