ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

केंंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करीत विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांच्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक हाती घेतले होते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय, एनआयए, आयकर विभाग, आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मोदी सरकार हा हाय हाय, ईडी झाली येडी, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. आता लढा सुरु झालेला आहे. महविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. ज्यावेळी इडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपावाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपाकडूनच चालविली जाते. हेच स्पष्ट होत आहे. गुरुवारी भाजपवाल्यांनी नवाब मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करुन त्यांचा अपमान केला आहे. हा आरोप करणार्‍या भाजपने आधी उत्तर द्यावे की, नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला पाकिस्तानात पंतप्रधान का गेले होते? नांदेड-मालेगावमधील बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग या भाजपच्या खासदार कशा झाल्या? कर्नल पुरोहितशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन का केले? याची उत्तरे आधी भाजपवाल्यांनी द्यावीत नंतर मोदी सरकारचा कारभार देशहितासाठी एक्स्पोज करणार्‍या मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे? असा टोला परांजपे यांनी लगावला.
विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत. सर्व सेक्युलर पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. दाऊदला फरफटत आणू, असे म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बैठक करतात; या बैठकीला स्वत: दाऊद उपस्थित होता. असे असताना 30 वर्षांपूर्वीच्या काही घटना समोर धरुन नवाब मलिकांना खोट्या आरोपांखाली अडकविण्यात आले आहे. वास्तविक, दाऊद आणि आयएसआयसोबत भाजपनेच हातमिळविणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, ब्लॉक, प्रभाग अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading