तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम ठाण्यातही मोठ्या प्रमाणार झाला असून आज सकाळपासूनच ठाण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. कालपासून ठाण्यात जोरदार वारे सुटले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी रिक्षा तसंच अनेक चारचाकींवरही झाडं पडल्यामुळे त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ठाण्यात कालपासूनच्या २४ तासात १३ झाडं पडण्याच्या तर १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या तर दोन रिक्षा, मारूती अल्टो, सँट्रो, इंडिगो, शेवरलेट, होंडा अक्टीव्हा या गाड्यांचं झाडं पडल्यानं नुकसान झालं. कोलबाड येथील आदर्श चाळीतील एका घराच्या छतावर तसंच आंबेडकर रस्त्यावरील एका चाळीतील घरावर झाड पडल्यानं छताचं किरकोळ नुकसान झालं. तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण ६ तक्रारी या धोकादायक स्थितीतील वृक्षांबाबत आल्या आहेत. तर पावसामुळे पाणी साचल्याची एकही तक्रार प्राप्त झाली नाही.