ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या एका गटानं जपानमधील क्योतो सांग्यो विद्यापीठाला भेट दिली. १८ जणांचा गट सध्या जपानच्या दौ-यावर आहे. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ आणि क्योतो सांग्यो विद्यापीठामध्ये सामंजस्य करार झाला असून आत्तापर्यंत या करारानुसार गेल्या ६ वर्षात जपानमधील ५ गटांमधील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या कॅम्पसला भेट दिली आहे. जपानला भेट देणारा हा पहिला गट असून विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राध्यापक आगासकर, क्योतो सांग्यो विद्यापीठाचे कुलगुरू तेरूमासा ओशिओरो यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा गट नारा आणि ओसाका शहरांना भेट देणार आहे. या भेटीमुळे जपान आणि भारतात सांस्कृतिक बंध निर्माण होण्यामध्ये मदत होईल असा विश्वास डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केला.