ठाण्यातील पुढील ३० वर्षांचं पाण्याचं नियोजन करणार पालिका आयुक्तांचं सुतोवाचं

भविष्यकाळातील ठाणे शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिका सक्रिय असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 27 लक्ष लोकसंख्येसाठी सद्यस्थितीत 585 द.ल.लि पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात येतो. यामध्ये महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 द.ल.लि, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 द.ल.लि., स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा कं. प्रा. लि. कडून 115 द.ल.लि., बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. आगामी 30 वर्षामध्ये शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेवून मुबलक आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून नियोजन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध धरणातून पाणी आरक्षण ठेवणेबाबत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येत आहे. विविध संस्थांकडून पाणी उपलब्ध करुन घेत असताना नियमित देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी शटडाऊन घ्यावे लागतात यामुळे पुढील दोन ते तीन दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन म्हणजेच पुढील 30 वर्षांचा विचार करुन वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने सक्रिय भूमिका घेवून पाणी आरक्षण ठेवणेबाबत नियोजन केले असल्याचेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील पाणी समस्यांबाबत बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये बारवी धरणातून पाण्याचा कोटा महापालिकेस देणेसाठी तसेच धरणाच्या वाढलेल्या उंचीच्या प्रमाणात साठा 100 द.ल.लि करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. या बैठकीत भातसा धरणातून महानगरपालिकेच्या योजनेद्वारे सध्या 250 द.ल.लि पाणी उचलले जाते. त्यामध्ये 50 द.ल.लि ची वाढ करुन अतिरिक्त कोटा मंजूर होणेसाठी मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या होत्या. मिराभाईंदर महानगरपालिकेस सूर्या धरणातून नजीकच्या काळात 218 द.ल.लि पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एम.आय.डी.सी आणि स्टेममार्फत त्यांना दिला जाणारा पाण्याचा कोटा हा अतिरिक्त होणार आहे. या अतिरिक्त उपलब्ध होणाऱ्या कोट्यामधून एमआयडीसीमार्फत 50 द.ल.लि आणि स्टेमकडून 50 द.ल.लि पाणी महापालिकेस उपलब्ध होणेस जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विक्रमगड तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी होत असलेल्या देहरजी धरणामधून 200 द.ल.लि. प्रती दिन पाणीपुरवठा होणेबाबतही जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. महानगरपालिकेस सद्यस्थितीमध्ये 616 द.ल.लि प्रतीदिन एवढा कोटा मंजूर आहे. 2055 पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणत: 1116 द.ल.लि प्रतीदिन एवढा पाणीपुरवठा अपेक्षित असून त्यानुसार महानगरपालिकेस नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून 400 द.ल.लि प्रतीदिन एवढा पाणीसाठा महानगरपालिकेस उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याने त्यास मान्यता मिळणेसाठीचा प्रस्ताव महानगर आयुक्त एमएमआरडीए आणि प्रधानसचिव, जलसंपदा विभाग यांना पाठविण्यात आला असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या शहापुर येथील मुमरी धरणाचे काम नजीकच्या काळात पुर्ण होणार असून त्यामधुन 100 द.ल.लि. पाणी आरक्षित ठेवणेबाबतची विनंती जलसंपदा विभागास करण्यात आली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading