नवरात्र घटस्थापना रविवारी सुर्योदयानंतर कधीही करावी पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती.

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. रविवार १५ ऑक्टोबर रोजी नवरात्रारंभ, घटस्थापना आहे. या दिवशी सूर्योदयापासून कधीही घटस्थापना करावी. विशेष मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली. अश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात येत असते. म्हणून या महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात निर्मिती शक्तीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा केली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यांचे अतूट नाते आहे. बी-बियाणे पेरल्यानंतर नऊ दिवसांनी रोपटे तयार होते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्मास येते. नऊ ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून नऊ संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. म्हणूनच निर्मिती शक्तीची पूजा करण्याचे नवरात्र नऊ दिवसांचे असते. अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवरात्रारंभ, घटस्थापना असते. या दिवशी कुलाचाराप्रमाणे तांब्याच्या किंवा मातीच्या घटावर ताम्हण ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता, महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि परिवार देवतांची स्थापना करतात. या घटाशेजारी नवे धान्य रुजत घालतात. हे रुजवण उत्सव समाप्तीनंतर मस्तकावर धारण करतात. देवता स्थापनेच्यावेळी नंदादीप, अखंड दीप लावतात. दररोज एक वाढत जाणारी नवी माळ मांडवाला बांधतात. सप्तशती, देवीभागवत, श्रीसूक्त ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करतात. नवरात्रारंभापासून नवरात्र संपेपर्यंत दररोज उपवास करतात. काही उपासक फक्त महाष्टमी आणि महानवमीच्या दिवशी उपवास करतात. महाष्टमी हे एक तिथी व्रत आहे. अश्विन शुक्ल अष्टमीला महाष्टमी म्हणतात.भद्रकाली ही या व्रताची प्रमुख देवता असते. तूप, तीळ आणि पायस यांचा होम करतात. सकाळी देवीच्या छत्र,चामर,वस्त्र, शस्त्र इत्यादी वस्तूंची पूजा करतात.रविवार २२ आक्टोबर रोजी संधीकाल सायं.७:३५ ते रात्री ८:२३ आहे. यावेळीही पूजा करण्याची प्रथा आहे.तर अश्विन शुक्ल नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात.दुर्गा ही या व्रताची देवता आहे.या दिवशी कुमारिका पूजन करून कुमारिकेला भोजन घालतात.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading