ठाण्यातील पाणी टंचाईवरून महापौर आणि महापालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी

ठाण्यातील पाणी टंचाईवरून महापौर आणि महापालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी झाली. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ही खडाजंगी झाली. शहरातील पाणी टंचाईवरून सर्वसाधारण सभागृहामध्ये तक्रारी केल्या जात असताना याला उपनगर अभियंत्यांनी उत्तरं दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी शहरातील पाणी नियोजनासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. महापालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेसंबंधी कामं हाती घेण्यात आली असून येत्या दोन अडीच वर्षात पाणी समस्या सुटेल असं त्यांनी स्पष्ट केलं. पाणी पुरेसं उपलब्ध होत असताना त्याचे नियोजन योग्य का होत नाही याबाबत महापौरांनी स्पष्टीकरण मागितलं. तसंच जलमापक बसवताना ती एकाच प्रभागात पूर्णपणे न बसवता प्रत्येक विभागांमध्ये थोडी थोडी का बसवली जात आहे याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता महापौर आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी झाली. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये ही जलमापकं बसवण्यात येत असून काही ठराविक घरांना ही जलमापकं बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या घरांना ही जलमापकं बसवण्यात आली नाहीत त्यांच्याकडून बीलं कशी वसूल करणार तसंच सर्वच प्रभागांमध्ये थोडी थोडी जलमापकं बसवण्याऐवजी प्रभागानुसार जलमापकं बसवण्याचं काम पूर्ण करा अशी मागणी महापौरांनी केली. त्यावर पहिल्या टप्प्यात व्यावसायिक वास्तू आणि गृहसंकुलांना जलमापक बसवण्याचे आदेश दिले आहेत असे आयुक्तांनी सांगितले. त्यावर नगरसेवकांनी झोपडपट्ट्यांमध्ये ही जलमापकं बसवली जात असल्याची बाब उघड करत प्रशासनाला कात्रीत पकडलं. यावर माहिती घेऊन कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading