मध्य रेल्वेला ऑक्टोबर महिन्यात तिकिट तपासणी अंतर्गत ७० टक्क्याहून अधिक वाढीव उत्पन्न

मध्य रेल्वेला ऑक्टोबर महिन्यात तिकिट तपासणी अंतर्गत ७० टक्क्याहून अधिक वाढीव उत्पन्न मिळालं आहे. मध्य रेल्वे द्वारा विना तिकिट तसंच अनियमित प्रवास करणा-यांविरूध्द मोहिम राबवण्यात आली. या अंतर्गत ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेला २२ कोटी ८७ लाखांचं अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षी याच काळात राबवलेल्या मोहिमेत १३ कोटी ४२ लाखांचं उत्पन्न मिळालं होतं. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विना तिकिट उत्पन्नात ७० टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात विना तिकिट आणि अनियमित प्रवाशांच्या सव्वा चार लाख प्रकरणांची नोंद झाली. एकाच महिन्यात या प्रकरणात जवळपास ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विना तिकिट, अनियमित प्रवास आणि योग्य तिकिटाविना प्रवास अशा एकूण २४ लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २१ लाख प्रकरणांची नोंद झाली होती. म्हणजे यामध्ये जवळपास १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विना तिकिट प्रवासी मोहिमेअंतर्गत १२६ कोटी ६७ लाखांचं उत्पन्न मिळालं. गेल्यावर्षी याच कालावधीत १०३ कोटी ७७ लाख रूपयांचं उत्पन्न मिळालं होतं. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात आरक्षित तिकिट प्रवासी हस्तांतरणाची ६९५ प्रकरणं झाली. त्यापोटी साडेपाच कोटीहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. २१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत १३ कोटी ९४ लाख रूपये तिकिट तपासणीतून मिळाले आहेत. मध्य रेल्वेनं सुविधाजनक आणि सन्मानानं प्रवास करण्यासाठी योग्य आणि कायदेशीर रेल्वे तिकिटासह प्रवास करण्याचं आवाहन प्रवाशांना केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading