ठाण्यातील तलावांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेची अत्याधुनिक यंत्रणा

तलावांचे प्रदूषण रोखण्याबरोबरच तलावांच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेनं आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचं ठरवलं आहे. यामुळं ठाणेकरांना तलावाच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे. ठाण्यामध्ये ३५ तलाव सध्या असून या तलावांचं सुशोभिकरण, प्रदूषण रोखणे, पाण्याची गुणवत्ता राखणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचं दिसत आहे. तलावाच्या पाण्यातील गुणवत्ता तपासण्यासाठी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात. पण आता पालिकेनं तलावांमध्येच अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर कचराळी तलावामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेमुळं तलावातील पाण्याची गुणवत्ता रोजच्या रोज उपलब्ध होणार आहे. या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून पाण्यामध्ये असलेल्या प्राणवायूचे प्रमाण तसंच अन्य घटकांची माहिती उपलब्ध होणार असून ही माहिती तात्काळ तलावाजवळ बसवलेल्या डिजीटल फलकावर प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळं पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. लवकरच मासुंदा, उपवन आणि आंबेघोसाळे तलावातही ही यंत्रणा बसवली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading