ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये होर्डींग उभारण्यासाठी अहमहमिका लागलेली असून आतातर मासुंदा तलावाजवळ उभारण्यात आलेला होर्डींगचा एक खांब थेट पदपथावर उभारण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मासुंदा तलावाचं लाखो रूपये खर्चून सुशोभिकरण करण्यात आलं आहे. या मासुंदा तलावावर सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर ठाणेकर फिरायला येत असतात. असं असताना स्टेशन रस्त्यावर उभारण्यात आलेल्या होर्डींगचा एक खांब मासुंदा तलावाच्या पदपथावर आल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा होर्डींगला महापालिकेनं परवानगी कशी दिली असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत. जोरदार वारा निर्माण झाल्यास हे होर्डींग पडू शकतं आणि यामध्ये एखादी दुर्घटनाही घडू शकते. ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी महापालिकेकडे याबाबत तक्रारही केली मात्र महापालिकेनं नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे.