ठाण्याच्या  नुबैरशाह शेखने विजेतेपद राखले –  दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिंकले सुवर्णपदक 

ललितपूर, नेपाळ येथे १३ ते १८ जून दरम्यान संपन्न झालेल्या दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर व सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथील स्थापत्य अभियंता नुबैरशाह शेख याने अपराजित राहत  सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. जागतिक बुद्धिबळ महासंघ  व आशियाई बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने आयोजित अधिकृत दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे यजमानपद नेपाळ बुद्धिबळ महासंघास बहाल करण्यात आले होते. ही दुसरी दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा होती. प्रथम दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा नोव्हेंबर -२०१९ मध्ये ढाका, बांगलादेश येथे संपन्न झाली होती. त्या स्पर्धेत देखील नुबैरशाह शेख याने देशाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकले होते. सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून नुबैरशाहने अनोखा विक्रम केला आहे. दक्षिण आशियाई आठ देशांपैकी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, मालदीव या देशांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. पुरुष व महिला दोन्ही गटाची ही स्पर्धा स्वतंत्रपणे घेण्यात आली. प्रत्येक देशातून एक अधिकृत खेळाडू व २०१९ च्या स्पर्धेचा विजेता यांनाच स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता.

पुरुष गटातील १० खेळाडूंची ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने ९ फेऱ्यात खेळविण्यात आली.
भारताचा ग्रँडमास्टर सायंतन दास यांच्यानंतर नुबैरशाहला दुसरे मानांकन लाभले होते. नुबैरशाहने पहिल्या फेरीपासूनच विजयी सुरुवात केली. पहिल्या लढतीत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना नुबैरशाहने भारताचाच ग्रँडमास्टर सायंतन दास यांस पराभूत केले. दुसऱ्या फेरीत आक्रमक चाली रचत नुबैरशाहने पाकिस्तानचा आमेर करीमला २१ चालीतच पराभव मान्य करायला लावला . तिसऱ्या फेरीत भूतानचा अननुभवी खेळाडू  देचन दोरजी यास सहज पराभूत केले. चौथ्या फेरीत नेपाळचा राष्टीय विजेता रुपेश जैस्वाल याने अटीतटीच्या लढतीत नुबैरशाहला बरोबरीत रोखले. नंतरच्या फेऱ्यात  नुबैरशाहने  बांगलादेशचे अनुभवी व वरिष्ठ खेळाडू मेहदी हसन पराग व मोहम्मद अब्दुल मालेक यांना पराभवाची चव चाखविली. नंतरच्या तीन फेऱ्यात  आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी खेळाडूस कोणतीही संधी न देता नुबैरशाहने दणदणीत विजय मिळविले. नुबैरशाहने स्पर्धेत अपराजित राहत ९ सामन्यातून आठ विजय व एक बरोबरीसह साडे आठ गुण मिळवून एक गुणांच्या निर्णायक आघाडीसह आपले वर्चस्व राखताना सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. भारताचाच ग्रँडमास्टर सायंतन दास याने साडे सात गुणांसह रौप्यपदक जिंकले. तर नेपाळचा रुपेश जैस्वाल सहा गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
दक्षिण आशियाई बुद्धिबळ समितीचे उपाध्यक्ष धर्मेंद्र कुमार, ललितपूर महानगरपालिकेचे महापौर चिरी बाबू महारंजन व नेपाळ बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष बिदुर प्रसाद गौतम यांच्या हस्ते नुबैरशाहस सुवर्णपदक व विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading