मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण

ठाणे महापालिका क्षेत्रातील मोठे रस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते, शौचालये, स्वच्छता आणि सुशोभीकरण यांची कामे सुरू आहेत. याच मोहिमेत ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी सहा सफाई यंत्रे घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सफाई यंत्रांचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते झाले. शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई या यंत्रांद्वारे करण्यात येणार आहे. आज सकाळपासून या गाड्यांच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती महामार्ग, वागळे इस्टेट या परिसरात सफाई सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत अशी यंत्रे बसवलेल्या दोन गाड्या महापालिकेकडे आल्या आहेत. एक गाडी दिवसभरात सुमारे ४० किमी रस्त्यांची सफाई करू शकेल. ही यंत्रे असलेल्या आणखी चार गाड्या उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होतील. या गाड्यामुळे शहरातील मोठ्या रस्त्यांची सफाई जलदगतीने होण्यास मदत होईल. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम या गाड्या करतील. त्याचबरोबर शहरातील छोट्या गल्ल्यांमध्ये साफसफाई व्हावी या दृष्टीने लहान इलेक्ट्रीकल गाडी आणण्याचाही विचार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली. यांत्रिक पद्धतीने केली जाणारी सफाई ही मनुष्यबळाचा वापर करून होत असलेल्या सफाईला पर्याय ठरू शकत नाही. परंतु, यांत्रिक पद्धतीने सफाई सुरू केल्यामुळे त्या ठिकाणचे मनुष्यबळ इतर रस्त्यांवरील सफाईसाठी वापरणे शक्य होईल. जेणेकरून मनुष्यबळाद्वारे केल्या जाणाऱ्या सफाईची कार्यक्षमता वाढवता येईल. यांत्रिक पद्धतीने सफाईमध्ये मशीनची देखभाल आणि दुरूस्ती हा कळीचा मुद्दा असतो. मशीन नवीन असताना जी कार्यक्षमता असते ती मशीन जुनी व्हायला लागल्यावर कमी होणे अपेक्षित नाही. त्यामुळे, संपूर्ण कालावधीत सफाईची कार्यक्षमता समान राहील, देखभाल आणि दुरुस्ती अत्युच्च दर्जाची राहील, याच्या सूचना कंत्राटदारास देण्यात आल्या आहेत असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यांत्रिक सफाईमुळे रस्त्यावरील कचरा उचलण्यास मदत होईल. तसेच रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला असलेली धूळ साफ करण्यास मोठी मदत होईल. महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, कॉंक्रिटचे रस्ते यांची सफाई या पद्धतीने करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading