ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमवीर सिंग यांना १० हजारांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमवीर सिंग आज ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मामलेदार कचेरीत असणा-या ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमवीर सिंग आल्यानंतर मामलेदार कचेरीचा दरवाजा लावून घेण्यात आला. परमवीर सिंग यांच्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात आलं नाही. गेले ७ महिने परमवीर सिंग गायब होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परमवीर सिंग हजर झाले असून काल त्यांनी मुंबईतील चौकशीला हजेरी लावली तर आज ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. या चौकशीनंतर परमवीर सिंग यांनी मुख्य महानगर दंडाधिका-यांच्या न्यायालयात हजेरी लावली. परमवीर सिंग न्यायालयात आले असताना न्यायालयाचे दरवाजे लावून घेण्यात आले आणि माध्यमातील मंडळींना बाहेरच रोखून धरण्यात आलं. न्यायालयामध्ये इतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास दाभाडे अशा २८ जणांनी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडो रूपयांची खंडणी उकळल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणातील २८ आरोपींपैकी इतर सर्वांची चौकशी झाली असून परमवीर सिंग चौकशीला हजर राहत नव्हते. परमवीर सिंग गायब असल्यामुळे त्यांच्याविरूध्द लुकआऊट नोटीसही काढण्यात आली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अदखलपात्र वॉरंट रद्द केला असून १० हजारांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर परमवीर सिंग यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना १५ हजारांचा जामीन द्यावा लागणार आहे. याची पूर्तता ३ डिसेंबर पूर्वी करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा जामीन मंजूर करत असल्याचंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading