ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत चर्चा

देशभरातील स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांचा केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे प्रतिनिधी अभ्यास करत असून ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांची फेलोशिप मिशनचे अंबर सिन्हा आणि जोश सिंग यांनी भेट घेऊन विविध प्रकल्पांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शहरात सुरू असलेल्या सर्व पथदर्शी प्रकल्पांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे प्रतिनिधी मदत करणार आहेत. यासाठी विशेष योजना तयार करण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रण, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वीज बचत, आरोग्य अशा महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये नागरिकांना सामावून घेण्यासाठी पुढील १० ते २० दिवस काही संशोधनात्मक प्रकल्प राबवून मिळणा-या माहितीच्या आधारे योग्य निष्कर्ष काढण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी डीजी ठाणेच्या माध्यमातून काही प्रोत्साहनपर योजना आखल्या जाणार आहेत. या सर्व विश्लेषणातून नागरिकांना महापालिकेच्या सर्व पथदर्शी प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी करून घेण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading