ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरण कामादरम्यान महापालिकेचाही सहभाग महत्वाचा – आयुक्त

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतलं जाणार असून यामध्ये महापालिकेचाही महत्वाचा सहभाग राहणार आहे. याची दिशा ठरविण्यासाठी रेल्वेचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बैठक झाली. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून हाती घेण्यात येणाऱ्या कामामध्ये महापालिकेचा सहभाग महत्वाचा आहे. रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची ये-जा सुलभ होईल आणि वाहतूक जलदगतीने होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असून सर्वात गर्दीचे स्थानक आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून रोज साडेसहा लाख प्रवासी प्रवास करतात. तर एक हजाराहून अधिक गाड्यांची ये-जा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व- पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे. या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबर सुरक्षितताही राखली जाणार आहे. या डेकवर प्रवाशासांठी आवश्यक प्रतीक्षागृह, तिकिटघर, शौचालय आदी सेवासुविधा उपलब्ध असणार आहेत. हा डेक ठाणे पश्चिम आणि पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडला जाणार आहे. तसेच रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत दोन आणि चार चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा, तीन ते चार व्यावसायिक इमारतीचे बांधकाम रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनमधून पुर्वेला 30 टक्के तर पश्चिमेला 70 टक्के प्रवासी बाहेर पडतात. ठाणे पश्चिमेला गोखले रोड आणि शिवाजी पथ या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. ही गर्दी होवू नये यासाठी हा परिसर फेरीवाला मुक्त करणे, तसेच पार्किंगच्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करुन देणे, त्या भागातील वाहतूकीच्या नियोजनाच्या पुर्नरचना अशा पध्दतीने करणे जेणेकरुन पादचाऱ्यांसाठी रेल्वेस्थानकाबाहेर चालण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होवून परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल या दृष्टीने करावे असे बांगर यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading