ठाणे महापालिका शाळांचा शालांत परीक्षेचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक चांगला लागला असून ४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ८ शाळांचा निकाल हा ९० टक्क्यांहून जास्त आहे. ठाणे महापालिका हद्दीत पालिकेच्या ११ शाळा या मराठी माध्यमाच्या, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येकी ४ तर दोन रात्रशाळा असून एकूण २१ शाळा आहेत. यामध्ये बाळकूम शाळा क्रमांक ४ आणि कौसा शाळा क्रमांक १२ या मराठी माध्यमाच्या, मुंब्रा शाळा क्रमांक १४ आणि टेंभीनाका शाळा क्रमांक १७ या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी २१ शाळा मिळून ७५ टक्के निकाल लागला होता तर यावर्षी त्यात बरीच वाढ होऊन ८८ टक्के लागला आहे.