ठाणे महापालिकेच्या आरोग्य सेवकांना गेले ५ महिने वेतनच दिले गेले नसल्याचा मिलिंद पाटील यांचा आरोप

ठाणे पालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य सेवकांना ५ महिने वेतनच दिले नसल्याबाबत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पालिकेचा पर्दाफाश केला आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आरोग्यसेवक जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. मात्र या आरोग्य सेवकांना त्यांचा मेहनतानाच ठाणे महापालिकेकडून देण्यात आलेला नाही. त्यामध्ये कार्डीयाक रुग्णवाहिका चालवणारे चालक आणि आशा स्वयंसेविकांचाही समावेश असल्याची बाब पाटील यांनी उघडकीस आणली आहे. पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांना ही बाब कळवूनही कर्मचार्‍यांना वेतन आणि मानधन देण्यात आलं नसल्याचं पाटील यांचं म्हणणं आहे. आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करुन आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. ठाणे पालिकेच्या सेवेत कार्डीयाक रुग्णवाहिका चालविणारे 26 चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. तर सुमारे 200 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे 1500 रुपयांचे मानधन देण्यात येते. मात्र हे अनुदानही जानेवारी महिन्यापासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कुटुंबियांची उपासमार होत आहे. पालिका आयुक्तांना फोनद्वारे ही बाब कळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी फोन न घेतल्याने मेसेज करुन चालक आणि आशा स्वयंसेवकांच्या रखडलेल्या वेतनाची माहिती दिल्याचं मिलिंद पाटील यांनी सांगितलं. तसेच, मुख्य आरोग्य अधिकारी माळगावकर यांनाही ही बाब सांगितली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दखलच घेतली गेली नाही असेही पाटील म्हणाले. ठाणे पालिकेच्या हलगर्जीपणा डायलेसीसच्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. सध्या अनेक रुग्णालये कोविड -19 साठी अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे डायलेसीससाठी रुग्णांना धावपळ करावी लागत आहे. पालिकेच्या वाडीया रुग्णालयात डायलेसीसची संपूर्ण यंत्रणा 10 महिन्यांपासून उभी आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने तिचा वापरच करण्यात येत नाही; ही बाबही संबधीतांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अशा अधिकार्‍यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे अशा शब्दात मिलींद पाटील यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading