ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाची आखणी केली आहे.
आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात, आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे. तसेच, शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. ही प्रशासकीय स्तरावर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात, लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचे सहकार्य मिळते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून, प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्याच सोबत, नागरिकांची मतेही जाणून घेण्याचीही गरज असते. म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करीत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला व बाल कल्याण या विभागांसाठी कार्यक्रमाची आखणी करताना त्यात काम करणाऱ्या, अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा ठरू शकतो. तसेच, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांचे प्रश्न लक्षात घेवून त्यांचे प्राधान्यक्रम ठरविणे शक्य होते. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच उपयोगी ठरतात.
म्हणूनच, नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी तीन महिन्यांमध्ये विविध गटांच्या माध्यमातून आयुक्त नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यात, डॉक्टर्स, वकील, सीए, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक संघटना आदींच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ठाणे शहरातील झोपडपट्टी क्षेत्रात राहणारी मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांच्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशीही हा संवाद होणार आहे. ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमातून ठोस मुद्दे समोर येऊ शकतील. त्यातून चर्चा होऊन महापालिकेच्या कारभारात नागरिकांचा सहभाग वाढीस लागेल, असा विश्वास आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading