ठाणे महापालिकेचे ९ सहाय्यक आयुक्त हफ्तेखोर असल्याचा देवराम भोईर यांचा आरोप

महापालिकेचे ९ सहाय्यक आयुक्त हे फेरीवाल्यांकडून हफ्ता घेत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला. सर्वसाधारण सभेमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करण्यावरून झालेल्या चर्चेदरम्यान भोईर यांनी हा आरोप केला. मुंब्र्यामध्ये जर फेरीवाल्यांवर कारवाई होऊ शकते तर ठाण्यात का होत नाही असा प्रश्न उपस्थित करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनावर टीका केली. शहरातील गोखले रस्ता, नौपाडा, स्टेशन रोड, बाजारपेठ आदी भागात फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली की त्यांच्यावरच पैसे घेतल्याचे आरोप केले जातात असा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी मांडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टोला लगावला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेरीवाल्यांच्या वाढलेल्या संख्येवर टीका करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. याच चर्चेदरम्यान देवराम भोईर यांनी महापालिकेचे ९ सहाय्यक आयुक्त हफ्तेखोर असल्याचा आरोप केला. त्याची छायाचित्रही आपल्याकडे असून यामुळंच कारवाई होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून शहरात १२ हजाराहून अधिक फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांसाठी १८४ विभाग करण्यात आले असून जागा अंतिम करण्यासंदर्भातील प्रकरणं फेरीवाला शहर कमिटीपुढे ठेवण्यात आल्याचं उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सांगितलं. महापौर मिनाक्षी शिंदे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावरून झालेल्या गोंधळादरम्यान त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले. तसंच त्यांचं साहित्य जप्त झाल्यानंतर ते सोडवण्यासाठी नगरसेवकांनी दबाव आणू नये अशी सूचनाही केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading