ठाणे महापालिकेची मालमत्ता कराची 720 कोटी इतकी विक्रमी वसुली

मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 मार्च या अखेरच्या एका दिवशी 14 कोटी इतकी वसुली झाली आहे. तर 1 मार्च  ते 31 मार्च  या एका महिन्यात 84 कोटी इतकी मालमत्ता कराची वसुली झाली आहे.

ठाणे शहरात विकासकामे मुलभूत सेवासुविधांबरोबरच ठाण्याच्या सौंदर्यीकरणामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानातंर्गत हाती घेतलेली विकास कामे पूर्णत्वास येत असून ठाण्याचे नवीन चित्र नागरिकांना अनुभवायला मिळत असून हे  निश्चितच नागरिकांनी कर रुपाने दिलेल्या प्रतिसादामुळे शक्य झाले आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 720 कोटी इतकी विक्रमी मालमत्ता कराची वसुली 30 मार्च रोजी म्हणजेच मार्च अखेर एक दिवस आधीच पूर्ण केली याबद्दल समस्त ठाणेकरांचे प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

2022-23 या आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी 705.25 कोटी इतके सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. सध्या 711 कोटी इतका मालमत्ता कर संकलित झाला असून तो एकूण अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या सुमारे 95 % इतका आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी 591 कोटी मालमत्ता कराची वसुली झाली होती.  यानुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालमत्ता कराच्या संकलनामध्ये 115 कोटीची विक्रमी वाढीव वसुली झाली आहे. ठाणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच 700 कोटीचा आकडा महापालिकेने पार केला आहे.

यामध्ये मार्च 2023 या एका महिन्यात  83 कोटी इतकी मालमत्ता वसुली झाली, पैकी 15 मार्च ते 30 मार्चपर्यत 59 कोटी वसुली झाली. यापैकी ऑनलाईन पध्दतीने 166 कोटी, धनादेशाद्वारे 349 कोटी, धनाकर्षद्वारे 100 कोटी, डेबीट कम एटीएम आणि क्रेडीट कार्ड पध्दतीने  2 कोटी,  रोखीने 93 कोटी इतकी वसुली झाली. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी  ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, ही योजना जास्तीत जास्त सोपी आणि सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे असेही आयुक्तांनी सांगितले.

जे करदाते थकबाकी आणि पहिल्या सहामाहिच्या करासोबत दुसऱ्या सहामाही अशी  एकरकमी करभरणा महापालिकेकडे 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या मालमत्ता करातील सामान्य करामध्ये  10 टक्के सूट तर 16  ते 30 जून या कालावधीत कर भरणाऱ्यांना 4 टक्के सूट, 1 ते 31 जुलै या कालावधीत कर भरणाऱ्यांना 3 टक्के तर 1 ते 30 ऑगस्ट या कालावधीत 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी करदात्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपला मालमत्ता कर भरणेसाठी आवाहन करण्यात येत आहे.

ज्या करदात्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर जमा केलेला नाही अशा करदात्यांना वॉरंट बजावून मालमत्तांची जप्ती / अटकावणी करण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाई अंतर्गत संबंधित मालमत्तेस महापालिकेकडून देण्यात येणान्या सेवा-सुविधा (नळ संयोजन व इतर) खंडीत करण्याचे सुरु आहे. यानंतर संबंधित मालमत्तेचे मुल्यांकन करुन जाहीर प्रसिध्दीकरणाद्वारे मालमत्तेचा लिलाव प्रक्रिया राबवून मालमत्ता कर वसूल करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता १ रूपया या नाममात्र किंमतीने महापालिकेच्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करणेकरिता प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी- सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून अथवा इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची आणि कोणास भेटण्याची गरज  पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे.

सन 2023-24 चा अर्थसंकल्प मंजूर झाला असून त्यामध्ये मालमत्ता करासाठी 800 कोटीचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. चालू वर्षात केलेल्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी 800 कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या प्रलंबित दायित्वाचे मोठे आव्हान आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी एका बाजूने खर्चाची आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे असून दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading