ठाणे पोलीसांतर्फे रक्तदान शिबीराचं आयोजन

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलीसांतर्फे काल रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या काळात ठाणे पोलीस आयुक्तालयातील १ हजार ८७७ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. यापैकी ३२ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना आपला जीव गमवावा लागला. कोविड आजारावर उपचार घेत असलेल्या रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून काल हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. ठाणे पोलीसांचा सिध्दी हॉल, जिल्हा सामान्य रूग्णालय, छत्रपती शिवाजी रूग्णालय, ब्लडलाईन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यातून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबीरात पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या शिबीराला भेट देऊन पोलीसांचं कौतुक केलं. या रक्तदान शिबीरामध्ये महिला पोलीसांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. भविष्यातही विविध पोलीस परिमंडळाच्या स्तरावर रक्तदान शिबीरं आयोजित करण्याचा मानस पोलीस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading