ठाणे पूर्वेतील चैत्र नवरात्रौत्सवाच्या देवी आगमनाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग

ठाणे पूर्वच्या श्री अंबे माता चैत्र नवरात्रोत्सव आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे माँ चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यात देवीच्या भव्य आगमन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही  सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला. तसेच यानिमित्ताने त्यांनी देवीचा रथही ओढला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि आनंदात चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला देवीचे उत्साहात आणि आनंदात आगमन झाले. यावेळी टाळ मृदुंग घेतलेले वारकरी, कोळीनृत्यावर ताल धरणारे कोळी बांधव, भरतनाट्यम सादर करणाऱ्या मुलींचा चमू, लेझीम पथक, दाक्षिणात्य वाद्य वाजवणारे कलावंत, कथकली नृत्य सादर करणारे कलाकार, पारंपरिक काठ्या, तलवारी, दानपट्टे याद्वारे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणारे तरुण तरुणी, मोठमोठे मुखवटे धारण केलेल्या मुर्त्या, पंजाबी, राजस्थानी, मारवाडी नृत्य सादर करणारे कलाकार असे नानाविध प्रकारचे कलावंत  यंदा या आगमन मिरवणुकीचे आकर्षक वाढविण्यासाठी यात सहभागी झाले होते. या सगळ्यांचा उत्साह वाढवून त्यांच्या कलेला दाद देत शिंदे यांनी या कलाकारांसोबत  छायाचित्रे काढली. जनतेतील मुख्यमंत्री ही ओळख कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा आणि प्रोटोकॉलची तमा न बाळगता या स्वागत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठांसोबत हितगुज केले तर तरुणाईसोबत मनसोक्त सेल्फी देखील घेतल्या. तर लहानग्या मुलांना हस्तांदोलन करत या मिरवणुकीत त्यांचाही उत्साह त्यांनी वाढवला. यावेळी खास कार्यकर्त्यांच्या  आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील अष्टविनायक चौकातील तंदूर वडापावही खाऊन त्याचाही आस्वाद घेतला.  एवढंच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खास आग्रह करत त्यांनाही तो खाऊ घातला. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत देवीची मिरवणूक काढून देवीला मंडपात आणले गेले. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि त्यांची सून वृषाली शिंदे यांनी देवीचे विधीपूर्वक पूजन केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या स्ते देवीचे पूजन करून तिची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ठाणे पूर्वेकडील तुकाराम मैदानात या जय अंबे माँ चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पुढील नऊ दिवस येथे अनेक सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading