ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे येत्या शनिवारपर्यंत २०० देशातील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. बँकेच्या राम मारूती रोडवरील शाखेत सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. या प्रदर्शनात ऐतिहासिक नोटांचा समावेश असून आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायाचित्र असलेल्या दुर्मिळ नोटा आणि नाणी ठाणेकरांना पाहता येणार आहेत. इंडोनेशियातील एका नोटेवर गणेशाचं चित्र, मोरोक्को या देशाची जगातील सर्वात लहान असलेली नोट, माँटेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिध्द झाला त्या मारिया माँटेसरी यांचं छायाचित्र असलेली इटालीची नोट, एडमंड हिलरी यांचं छायाचित्र असलेली न्यूझिलंडची नोट, विविध देशातील नोटा आणि नाणी, १०० ट्रिलियन डॉलरची चलनी नोट, गयाना देशातील पोस्टल स्टँपवर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचं चित्र अशा अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण नोटांचं प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उपव्यवस्थापक संजय जोशी यांचं हे संकलन आहे.