ठाणे जनता सहकारी बँकेचा या वर्षात २० हजार कोटींचा व्यवसाय तर १५५ कोटींचा निव्वळ नफा

ठाणे जनता सहकारी बँकेला गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात १५५ कोटी रूपयांचा विक्रमी नफा मिळाला आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जनता सहकारी बँक आपला आर्थिक ताळेबंद दरवर्षी १० एप्रिल पूर्वी जाहीर करते. आपला ताळेबंद आर्थिक वर्ष संपल्यानंतर केवळ ९ ते १० दिवसात सादर करणारी भारतातील नागरी सहकारी बँकेमधील पहिली बँक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेनं २० हजार कोटी रूपयांची उत्तुंग भरारी घेतली आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात १ हजार २८७ कोटी रूपयांची वाढ झाली. तर कर्ज पुरवठ्यातही १ हजार ९२ कोटी रूपयांची वाढ झाली. बँकेकडे १३ हजार ३३६ कोटी रूपयांच्या ठेवी असून बँकेनं ६ हजार ७२३ कोटी रूपयांचा कर्ज पुरवठा केल्याची माहिती विवेकानंद पत्की यांनी दिली. बँकेनं या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या व्यवसायात १३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये ११ टक्क्यांची तर कर्ज पुरवठ्यामध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेला या आर्थिक वर्षात २३७ कोटी रूपयांचा ढोबळ नफा तर १५५ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेकडे १ हजार ४१२ कोटी रूपयांचा स्वनिधी असून बँकेचा कॅपिटल अॅडेक्वसी रेशियो १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बँकेच्या ढोबळ अनउत्पादित कर्जाचे प्रमाण गेल्यावर्षी ४.२३ टक्के होतं. ते या आर्थिक वर्षात ३.९३ टक्क्यांइतकं कमी झालं आहे. बँकेनं एनपीएचं प्रमाण ० टक्के राखलं आहे. बँकेनं टीसीएस या नामांकीत कंपनीच्या कोअर बँकींग सोल्यूशनची निवड केली असून हा बदल या वर्षात कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट बँकेनं ठेवल्याचं बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading