ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं दोन उच्चशिक्षित आरोपींना केलं जेरबंद

ठाणे पोलीस आयुक्तालयात ऑनलाईन फसवणुकीचे आणि सायबर क्राईमचे गुन्हे वाढत असून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं दोन उच्चशिक्षित आरोपींना जेरबंद केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ओएलएक्स वरून गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात काहीजण फसवणूक करत असल्याची तक्रार कापुरबावडी पोलीसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखा समांतर तपास करत होती. या तपासामध्ये त्यांना एका एटीएमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक आरोपी दिसला. त्या आधारे रोहित धवन आणि रूनित शहा अशा दोघांना अटक करण्यात आली. या दोघांची कसून चौकशी झाली असता व्यवसायामध्ये आलेल्या अपयशातून त्यांनी युट्यूबवरून हाऊ टू मेक ईझी मनीचे व्हीडीओ पाहिले आणि त्यानुसार फसवणुकीची योजना सुरू केली. हे दोघं ओएलएक्सवर विक्रीला आलेल्या चारचाकी गाड्या शोधत असत. या गाड्यांवर कर्ज असेल तर ते अशा गाड्या मिळाल्यावर संबंधितांशी संपर्क करत. त्यांना बनावट सीमकार्ड वापरून संपर्क करत असत. स्वत:च्या नावाचे आधारकार्ड, पॅनकार्ड बनावट बनवत असत. तसंच त्यांनी ओएलएक्स वरून मोबाईलही खरेदी केले होते. या सीमकार्ड आणि मोबाईलचा वापर करून त्यांनी ओएलएक्स वर वेगवेगळे अकाऊंट उघडले होते. ज्या गाड्यांवर बँकेचं लोन आहे अशा चारचाकी गाड्या खरेदी करत. गाडी खरेदी करताना मालकास स्वत:ची खरी ओळख लपवून बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड देऊन गाडी खरेदी करत असत. कमीत कमी पैसे देऊन ते चेकने गाडी खरेदी करत असत. त्यानंतर घेतलेल्या गाडीचे दुसरे मॉडेल ओएलएक्सवर शोधत आणि त्या गाड्यांचे स्मार्ट कार्ड, आरसी बुक आणि इतर कागदपत्रं डाऊनलोड करून लोन असलेल्या गाडीला लावत असत आणि या गाड्या पुन्हा ओएलएक्स वर विकत असत. गाडी मालकाला दिलेला खोटा चेक वटत नसे आणि बँकेचे कर्मचारी कर्जफेडीसाठी मागे लागत असत. असे फसलेले गाडीचे मालक या दोघांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत पण बनावट नंबरमुळे त्यांचा संपर्कच होत नसे. हे दोघेजण कॉम्प्युटरमध्ये मास्टर असून ऑनलाईन व्यवहार करण्यात हुशार आहेत. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading