ठाणेकर अभय ओक यांनी स्वीकारला कर्नाटक उच्च न्यायालायच्या मुख्य न्यायमूर्तीचा पदभार

ठाण्याचे रहिवासी असलेल्या अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली असून काल त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी अभय ओक यांना पद आणि गुप्ततेची शपथ दिली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी उपस्थित होते. अभय ओक हे मुंबई उच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ न्यायाधिश होते. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यामुळं हे पद रिक्त होतं. अभय ओक हे ठाण्याचे रहिवासी असून १९८३ मध्ये त्यांनी ठाणे जिल्हा न्यायालयात वकिलीस सुरूवात केली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली आणि २००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात त्यांची पूर्णवेळ न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलिकडेच मुंबई आणि गोवा बार असोसिएशननं अभय ओक यांना एका शानदार कार्यक्रमात निरोप दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वकील वर्ग आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता. अभय ओक न्यायालयातून बाहेर पडत असताना न्यायालयाच्या गॅलरींमध्ये त्यांना निरोप देण्यासाठी कर्मचारी मोठ्या संख्येनं उभे असल्याचं चित्र पहायला मिळालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading