ठाणेकरांनी स्वत:ची काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन

कोरोनाबाबत घाबरून न जाता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. राज्याच्या विविध भागात कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्वच स्तरावर आवश्यक ती काळजी आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका देखील कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सज्ज असून पालिकेची रूग्णालयं, दवाखाने या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या आजाराबाबत नागरिकांनी घाबरून न जाता आणि अफवांवर विश्वास न ठेवता स्वत: दक्ष राहून स्वच्छतेच्या बाबतीत आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी केलं आहे. कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी तसंच आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात ८ खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून या रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स २४ तास कार्यरत राहतील यादृष्टीनं नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्तांनी यावेळी दिली. पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात आवश्यक ती उपाययोजना करावी तसंच अत्यावश्यक सेवा म्हणऊन व्हेंटीलेटरचीही सुविधा उपलब्ध करण्यात यावी असे आदेश यावेळी देण्यात आले. तसंच सर्व शाळा, विविध आस्थापना, सार्वजनिक रहदारीची ठिकाणं, परिवहन बससेवेच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणं आणि घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देणारी पत्रकं लावण्यात यावीत तसंच सार्वजनिक जीवनामध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबतही भित्तीपत्रकं लावावीत असं त्यांनी सांगितलं. सर्व शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे, हस्तांदोलन करणे टाळावे, प्रत्येक वेळी हात पाण्याने स्वच्छ धुवावेत तसंच कोणताही आजार उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन राजेंद्र अहिवर यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading