ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे – जोगेंद्र कवाडे

आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते. अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवशक्ती-भीमशक्ती’मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवाडे बोलत होते. संघर्ष करणार्‍या नेतृत्वाच्या मागे आपण उभे राहिलेच पाहिजे. बाबासाहेबांचे संत रविदास यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळेच बाबासाहेबांनी आपला एक ग्रंथ संत रविदासांना अर्पण केला आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हे फक्त दलितांना सांगितले नाही. तर, सबंध भारतीयांना त्यांनी हा संदेश दिलेला आहे. सध्याच्या राजकारणावर कवाडे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. आपणही तसाच संघर्ष केला आहे. त्यामुळेच आम्हा दोघांमध्ये एक वाक्यता आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणून ते चुकीचे आरोप करीत आहेत. परंतु, आजचे सरकार हे दलित, आदिवासी, गोरगरीब लोकांचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून आपण गटई कामगारांच्या समस्यांचा पाठपुरावा करु, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading