टोरंटचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी सुरू असलेलं साखळी उपोषण दुस-याच दिवशी स्थगित

टोरंट हटाव कृती समितीच्या वतीनं टोरंट पॉवर कंपनीचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी कालपासून सुरू करण्यात आलेलं साखळी उपोषण आज दुस-याच दिवशी स्थगित करण्यात आलं आहे. कळवा, मुंब्रा, दिवा आणि आजूबाजूच्या वीज बील वसुली आणि वितरणाचं काम टोरंट कंपनीला देण्यात आलं आहे. या विरोधात कळवा-मुंब्र्यातील वीज ग्राहकांनी टोरंट हटाव कृती समिती स्थापन केली असून या समितीच्या वतीनं हे आंदोलन केलं जात होतं. टोरंट कंपनीला देण्यात आलेला वीज बील वसुली आणि वितरणाचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी उर्जामंत्र्यांनी या ठेक्याला स्थगिती देत असल्याचे आदेश दिले होते. मात्र कोणताही लिखित आदेश नसल्यानं पुन्हा समितीतर्फे टोरंट कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण आंदोलनाला सुरूवात करण्यात आली होती. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन टोरंट कंपनीला या विभागात येऊ देणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर या उपोषणास स्थगिती देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading