जेम्स, ज्वेलरीच्या व्यवसायात नफ्याचं प्रलोभन दाखवून लाखो रूपयांचा गंडा घालणारा ज्योतिषी ७ वर्षांनी ठाणे पोलीसांच्या ताब्यात

जेम्स, ज्वेलरीच्या व्यवसायात नफ्याचं प्रलोभन दाखवून लाखो रूपयांचा गंडा घालणारा नाशिकचा ज्योतिषी अखेर ७ वर्षांनी ठाणे पोलीसांच्या ताब्यात अडकला आहे. राजेश भोयल असं या भामट्याचं नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे. या भामट्या ज्योतिषानं ठाण्यातील व्यापारी स्नेहल चव्हाण आणि भागीदार प्रशांत डावखर आणि संजय नाईक यांची फसवणूक करून २०१२ मध्ये धूम ठोकली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. हा भामटा प्रभात सिनेमाजवळील सुवर्णस्पर्श जेम्स ॲण्ड ज्वेलरी दुकानात ज्योतिषी होता. त्याच इमारतीत चव्हाण यांचा गारमेंटचा व्यवसाय होता. याच ओळखीतून भोयलनं जेम्स ज्वेलरीच्या व्यवसायात जास्त नफा असल्याचं भासवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जानेवारी २०१० मध्ये चव्हाण आणि नाईक यांनी कळवा येथे भाड्याचं दुकान घेऊन लाखो रूपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर डावखर यांनीही भोयलच्या सांगण्यावरून आणखी गुंतवणूक केली. एकूण २१ लाख ३५ हजार रूपये घेऊन भोयल पसार झाला होता. अखेर कळवा पोलीसांनी ७ वर्षानंतर भोयलला नाशिकमधून जेरबंद केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading