समता विचार प्रसारक संस्थेचं ईद-दीपावली संमेलन

परिस्थिती कितीही कठीण आणि कठोर असली तरी न डगमगता सत्याची कास धरत तिच्याशी दोन हात करत आपली स्वप्नं पूर्ण करणं हे सर्वांचं ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन घर बचाव, घर बनाव आंदोलनाच्या जमीला बेगम इताकुला यांनी केलं. समता विचार प्रसारक संस्थेच्या ईद दीपावली संमेलनात त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष संजय मंगला गोपाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. घरगुती अत्याचार आणि सामाजिक अन्याय यांना न डगमगता समर्थपणे तोंड देत जमीला यांनी स्वत:चे विश्व उभे केले. स्वत:साठी आवाज उठवताना त्या आजूबाजूच्या शोषित, वंचितांच्या आवाज झाल्या. त्यांचा हा प्रवास एकलव्य मुलांसाठी प्रेरणादायी होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही समता विचार प्रसारक संस्थेचे ईद-दीपावली संमेलन जोशात साजरे झाले. संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, नाट्य आदी कला सादर करण्याची संधी मिळावी या हेतूनं हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. जवळपास १०० हून अधिक एकलव्य या संमेलनात सहभागी झाले होते. कळवा महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील आम्ही बंजारा संघानं क्रिकेटमध्ये बाजी मारली तर याच शाळेतील दहावीच्या मुलांचा दुसरा ओमसाई संघ उपविजेता ठरला. कबड्डीमध्ये कळव्याच्या महापालिका माध्यमिक शाळेतील दहावीच्याच वर्गाचा जय साई गतविजेता तर मानपाड्याच्या माध्यमिक शाळेचा साईरत्न गट उपविजेता ठरला. बुध्दीबळामध्ये दुर्वेश भोईर, कॅरम स्पर्धेत किर्ती निकाळजे तर मुलांमध्ये इनो पोलीया प्रथम आला. चित्रकलेमध्य एंजल खैरालिया पहिली, रांगोळी स्पर्धेत मनिषा सांबारे आणि संगिता पवार प्रथम आल्या. श्रृती केदारे, कुमकुम राठोड, आरती पवार आदी मुलींनी नृत्य तर वंचितांच्या रंगमंचमधील रमाबाई आंबेडकर नगरातील मुलांनी आम्हांला पण नाटक करायचंय ही नाटिका सादर केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading