जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील

जिल्हाधिका-यांच्या दालनात आज एक आगळावेगळा अनौपचारिक असा सोहळा पार पडला. जिल्ह्यातील 16 बालकांना आज एकाच वेळी कायदेशीररित्या पालक मिळाले. दत्तक आदेश घेताना पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. तर ही प्रक्रिया पार पडताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हेही भावुक झाले होते. बाल न्याय अधिनियम 2015 नुसार अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक आणि सावत्र दत्तक करण्याकरीता दत्तक नियमावली 2022 तयार करण्यात आली आहे. त्यानुसार आदेश पारीत करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी हे दत्तक आदेश न्यायालयामार्फत केले जात होते. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी करून इच्छुक पालकांकडे दत्तक बालके देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिका-यांनी आज पालकांना सुपूर्द केले. यावेळी दत्तक घेतलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट आणि डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक संस्थांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. बालकल्याण समिती ठाणे यांच्या आदेशान्वये या दोन्ही संस्थांमध्ये अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. CARA (Central Adoption Resource Authority) CARINGs cara.nic.in या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून ‘कारा’ ने दाखविलेले मुलगा किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेश करीता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येते. अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागित बालकांना पालक मिळणे आणि याचा आनंद हा त्या बालकांच्या चेहऱ्यावर पाहणे क्षण आगळावेगळा आहे. हे मानवतेचे काम माझ्या सहीने होत आहे, हा माझ्या जीवनातील अनोखा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी व्यक्त केली. दत्तक घेणाऱ्या पालकांशी शिनगारे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी दत्तक जाणारी बालकेही उपस्थित होती. त्यांच्या हसण्या-खेळण्याने जिल्हाधिकारी यांच्या दालनाला आज वेगळेच रुप आले होते. जिल्ह्यातील 6 महिना ते 6 वर्षाची मुले वर्षामधील 16 बालकांचे दत्तक आदेश आज जिल्हाधिका-यांनी पारित केले. विशेष म्हणजे मुली दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. दत्तक गेलेल्यांपैकी 11 मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. आज आदेश दिलेल्यांमधील दोन मुली या अमेरिकेतील पालकांकडे तर एक मुलगा हा इटलीतील पालकांकडे जाणार आहे. तर महाराष्ट्रात 7, ओरिसामध्ये, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात या राज्यात प्रत्येकी एका पालकांकडे ही बालके दत्तक गेली आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading