जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. कृषिदिनाचं औचित्य साधून आज त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रानभाज्या महोत्सव आणि कृषी संजीवनी मोहिमेचा समारोपही करण्यात आला.
जिल्ह्यातील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे आणि भागवत यांनी कृषी क्षेत्रात केलेलं काम उल्लेखनीय असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सुचवलेले पर्याय वापरून शेती करण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यासोबतच त्यांनी शोधलेल्या एसआरटी पद्धतीने भातशेती केल्याने शेतकऱ्यांचे श्रम वाचतील, पैसे वाचतील आणि त्याला जास्त उत्पन्न मिळू शकेल त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात आधी भात आणि नाचणी ही दोनच पिके घेतली जायची मात्र आता भेंडी, भोपळी मिरची, काकडी, हळद अशी अनेक पिकं घेतली जातात.
कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन केल्यानेच आज यातील काही भाजा परदेशात निर्यात होत आहेत. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, स्थानिक हवामान पाहून त्यानुसार पिकांचे पॅटर्न ठरवले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गडचिरोली प्रमाणेच ठाणे जिल्ह्यात देखील स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट यासारखे जास्त नफा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील आवर्जून नमूद केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले कृषीतज्ज्ञ शेखर भडसावळे यांनी शेतकऱ्यांना नवीन पध्दतीने शेती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. एसआरटी ही भात लागवडीची पद्धत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून येत्या काही वर्षात ती या जिल्ह्याचे अर्थकारण पुरते बदलून टाकेल आणि शेतकऱ्यांना नवीन आत्मविश्वास देईल, असे मत त्यांनी व्यक्त केलं. २१ जून ते १ जुलै या कालावधीत जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यानुसार यावर्षी देखील रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याशिवाय शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी छत्री, वजनकाटा, प्लॅस्टिक कॅरेटस आणि स्टँड याचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील आशा कीटक नाशक फवारणी करतांना घेण्याची काळजी, औषधी वनस्पती लागवड करताना घ्यायची काळजी, भात आणि भेंडी लागवड पद्धती पुस्तिकांचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. याच कार्यक्रमात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, जिल्हास्तरिय हरभरा पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी आणि भात आणि भेंडी लागवड स्पर्धेतील विजेते शेतकरी यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading