जन आशीर्वाद यात्रेला ठाण्यात अभूतपूर्व प्रतिसाद

स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण झाली तरी आजवर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाले नव्हते, ते मोदीजींमुळे मिळाले आहे असे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांनी आज ठाण्यातून जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ करताना सांगितले. पंतप्रधानांनी आम्हा सर्व नवीन मंत्र्यांना जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवले आहे, असे उद्गार त्यांनी काढताच उपस्थित जनसमुदायाने त्यांना जोरदार घोषणा आणि टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यावेळी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कपील पाटील यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. जिल्ह्याचे पहिले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला आज पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील आनंदनगर चेकनाक्याहून सुरू झालेल्या या यात्रेचे ठाणे शहरातील चौका-चौकात उत्स्फूर्त स्वागत करत नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आशीर्वाद दिला. आता पुढील चार दिवसांत ठाणे आणि रायगड या ठिकाणी कपील पाटील या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील यांचे या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या मातीतील या भूमिपूत्राचे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही जल्लोषात स्वागत केले. तसेच ओबीसी खासदाराचा मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ढोल-ताशांच्या निनादात रॅली काढण्यात आली. वागळे इस्टेट, इंदिरानगर, पाचपाखाडी, तलावपाळीपर्यंत रॅली जात असताना कार्यकर्त्यांच्या उत्साहात वाढ होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलावपाळी येथील पुतळ्याला पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी टेंभीनाका येथे स्व.आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याच परिसरातील जैन मंदिरासही त्यांनी भेट दिली. त्यानंतर भाजपाच्या शहर कार्यालयालाही कपिल पाटील यांनी भेट दिली. तेथे त्यांचे जोरदार स्वागत झाले. खोपट, शिवाईनगर, पोखरण रोड नं. २, मानपाडामार्गे जन आशीर्वाद यात्रा बाळकूममध्ये पोचली. तेथील ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्राला पाटील यांनी दिली. त्यानंतर कळवा, मुंब्रा येथून जनआशीर्वाद यात्रा डोंबिवलीकडे रवाना झाली. या यात्रेच्या दरम्यान विविध ठिकाणी पाटील यांनी भाजपाचे बूथ अध्यक्ष, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी, दिव्यांग नागरिक यांची भेट घेऊन संवाद साधला. या यात्रेदरम्यान कपिल पाटील यांना मुंब्रा रेतीबंदर येथे संघर्ष समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने ठाणे शहरात भाजपाचा `माहौल’ तयार झाला होता. शहराच्या विविध भागातून जाणाऱ्या यात्रेबाबत सामान्य नागरिकांमध्येही उत्साह पाहावयास मिळाला. या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिपदाबद्दल कपिल पाटील यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading