छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालयाची सुवीधा

एखादा व्यक्ती आजारी पडला तर रुग्णांसहीत नातेवाईकांची तारांबळ उडते. मानसिक ताणतणाव वाढतो, अशावेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी नव्या मित्राची साथसंगत देण्याची योजना आखली आहे. हा मित्र म्हणजे पुस्तक असून, यापुढे कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती महाराज शिवाजी रुग्णालयात गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण हे विविध उपचारांसाठी येत असतात. या ठिकाणी दररोज ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही साधारणत: पंधराशेच्या आसपास असल्यामुळे उपचारासाठी रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकाला नंबर येईपर्यत तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या सोबत असलेल्‌या व्यक्तींच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी वाचनालयाचा निश्चितच उपयोग होणार आहे. तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा बरे होवून घरी जाण्याचा कालावधी हा पाच ते सात दिवसांचा असतो, अशा रुग्णांसाठी वॉर्डमध्ये स्वतंत्र वाचनालय असेल. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून हे वाचनालय आकार घेत असून लवकरच रुग्णालयाच्या सेवेत हे वाचनालय दाखल होणार आहे. नुसतेच रुग्णांसाठी नव्हेतर रुग्णालयात काम करणाऱे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्यासाठी देखील वेगळे वाचनालय असेल. या वाचनालयात वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी, रुग्णालय व्यवस्थापन यांच्याशी संबंधित मासिके आणि पुस्तके उपलब्ध असतील. एकंदर वाचनालयाच्या माध्यमातून पुस्तकांची निवड अशा पध्दतीने केली जाणार आहे, ज्यातून रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील असा प्रयत्न करण्याकडे भर असेल. ज्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम त्यांच्या तब्बेतीवर सकारात्मकपणे होवू शकेल. पुस्तकांच्या निवडीमध्ये बहुभाषिक पुस्तके, सकारात्मक विचार- प्रसार करणारी पुस्तके, विनोदी पुस्तके, स्वत:ची काळजी कशी घ्यावी (सेल्फ हेल्थ) आदी माहितीपर अशी पुस्तके ठेवली जातील. रुग्णालयात येणारे रुग्ण हे आजारामुळे चिंतेत असतात, या रुग्णांना काही अंशी दिलासा मिळावा आणि त्यांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी रुग्णालयात वैचारिक कोपरा सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक स्वरुपात वाचनालयाची मांडणी करणार असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला या वाचनालयात जावून पुस्तक चाळावेसे वाटेल असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीअभावी पुस्तके विकत घेणे परवडत नाही. यासाठी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत असून टप्याटप्याने महापालिकेच्या इतरही आरोग्यकेंद्रात वाचनालये सुरू करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन असेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading