धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३३ किलोमीटरचे अंतर भर थंडीत पोहून ठाण्यातील जलतरण पटुंनी केले पार

धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३३ किलोमीटरचे अंतर भर थंडीत पोहून ठाण्यातील जलतरण पटुंनी पार केले. सध्या दुपारच्या वेळीस उन्हाची तीव्रता जाणवत असली तर पहाटेच्या सुमारास मात्र थंडीचा तडाखा जाणवतोच. अशा वातावरणात साधारण ८ ते १७ वयोगटातील त्या मुला मुलींनी भल्या पहाटे ४ वाजता धरमतरच्या जेटीवरून स्वतःला पाण्यात झोकून देत तब्बल ९ तासांनी गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने शहिदांना आणि ठाणेकरांसाठी पितृतुल्य असणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांना आगळीवेगळी मानवंदना दिली. ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलावात सर्वश्री अर्णव पाटील, अमीर साळसकर, जयराज नाखवा, वंशिका आयर, रोहन राणे, अथर्व पवार , सोहम देशपांडे, करण नाईक, मित गुप्ते, मनोमय लिंगायत, अमोल दिवाडकर, स्वरा हंजनकर, रुद्र शिलारी, अपूर्व पवार, गौरी नाखवा, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, श्रीकर पेडणेकर आदी युवा होतकरु जलतरणपटू नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा कसून सराव करतात. खडतर सरावामुळे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी ३३ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार असा त्यांना पूर्ण विश्वास होताच. ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकी नऊ जणांचे असे दोन गट तयार करण्यात आले. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिल्यावर प्रत्येकी एक किलोमीटर अंतरांनंतर आपल्या पुढच्या सहकाऱ्याला टाळी देत दुपारी १ वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना स्पर्श करत त्यांनी आपली मोहीम फत्ते केली. सागरी जलतरणात मानसिक आणि शारीरिक क्षमतेचीही कसोटी लागते. त्यातून आव्हानाला सामोरे जाण्याची सवय मुलांना व्हावी याकरता ही मोहीम आखण्यात आली होती. अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आरती प्रधान यांनी या मोहिमेचे प्रोजेक्ट इंचार्ज म्हणून काम पाहिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading