छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत कंत्राटदारावर कारवाईचे करण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत सफाईचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या सफाईसाठी 180 कर्मचारी अपेक्षित असताना हजेरीपटावर 108 कर्मचारीच आढळून आल्याने कमालीचा संताप व्यक्त करीत रुग्णालयाचा सर्व परिसर हा स्वच्छ राहिलाच पाहिजे, याबाबत कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचेही बांगर यांनी नमूद केले. यावेळी रुग्णालयाच्या तळमजल्यावरील सर्व प्रकारच्या तपासणीचे बाह्यरुग्ण विभाग, क्ष- किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, एमआरआय कक्षाची पाहणी, लेबर वॉर्ड, एनआयसीयू, औषधी कक्ष, अतिदक्षता विभागांची पाहणी आयुक्तांनी केली. सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत केसपेपरसाठी रुग्णांची गर्दी होत असल्याने रुग्णांना विलंब होणार नाही, वेळेत उपचार होतील यासाठी केसपेपर, औषधांसाठी अतिरिक्त खिडक्या वाढविणे तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र असलेल्या खिडकीवर गरोदर मातांचाही समावेश करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तपासणीनंतर रुग्णांना देण्यात येणारे औषध घेण्यासाठी रुग्णांची फार मोठी रांग असल्याचे निदर्शनास येताच बांगर यांनी रुग्णांशी संवाद साधला. औषधे घेण्यासाठी रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी अतिरिक्त औषध खिडक्या वाढविण्यात याव्यात आणि यासाठी लागणारा अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी वर्ग घेण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या. या पाहणी दौऱ्यादरम्यान दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागाला दिले आहे. बालरोगतज्ज्ञ विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी आयुक्तांनी केली. रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सद्यस्थितीत 20 बेड कार्यरत असून अतिरिक्त 10 बेड कार्यरत करण्याच्या सूचना दिल्या. गोवर वॉर्डचा आढावा घेताना किती रुग्ण दाखल आहेत, आयसीयूमध्ये रुग्ण दाखल आहेत का, दररोज किती रुग्ण दाखल होतात याची माहिती घेतली. त्याचबरोबर पार्किंग प्लाझा येथे किती रुग्ण दाखल आहेत याचाही आढावा घेतला. गोवरच्या बालकांची बालरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत दारिद्रयरेषेखालील रुग्णांचे मोफत उपचार केले जातात. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चर्चा केली असता सोनोग्राफी मशीनचे कारट्रेज संपल्याचे निदर्शनास येताच तातडीने मशीनसाठी कारट्रेज खरेदी करा. रुग्णालयातील तातडीच्या खरेदीसाठी 1 लाख रुपयांची रक्कम वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्तरावर देण्याबाबत सांगितले. कोणत्याही कारणास्तव रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या. गोरगरीब रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांनी सुरक्षा रक्षक किंवा कर्मचाऱ्यांना माहिती विचारल्यास त्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गैरसुविधांचा सामना करावा लागतो, तसेच अनेकदा त्यास विलंबही होतो. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा सध्या रुग्णालयात तीन दिवस तपासणी सुरू असते. दिव्यांग व्यक्तींना सहजपणे दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे यासाठी तपासणी सहाही दिवस सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एम.आर.आय. आणि सी.टी. स्कॅन कक्षास भेट देऊन उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधला तसंच घेतल्या जाणाऱ्या चार्जेसची माहिती घेतली.
रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस आणि डकमध्ये भंगार झालेले बेडस् आणि इतर साहित्य इतरस्त्र ठेवल्याचे निदर्शनास येताच हे साहित्य तातडीने हटविणे तसेच पॅसेजमधील सामान काढून ते मोकळे करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या. तसेच या डकमध्ये पाणी साचणार नाही, पॅसेज स्वच्छ राहतील या दृष्टीने कार्यवाही करावी. पॅसेजमध्ये चेंबरची झाकणे नीट बंद असतील याची दक्षता घ्यावी, तसेच भिंत्तीवरील फाटलेली आणि अर्धवट अवस्थेत असलेली माहितीपत्रके काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रुग्णालयाच्या स्वयंपाकघराचीही पाहणी आयुक्‌तांनी केली. रुग्णांना देण्यात येणारे जेवण गरम राहिल, स्वयंपाकघरात स्वच्छता राहिल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयाच्या आवारात असलेल्या उद्यानामध्ये आणखी झाडे लावण्यात यावीत जेणेकरुन येथील वातावरण प्रसन्न राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading